Sunday, February 26, 2012

३१ मार्च २०११ ला लिहिलेलं इमेल ..

प्रिय मित्र हरीश पोहेकरला नविन देशात आल्यावर ५ महिने उलटून गेल्या नंतर ३१.३. २०११ ला लिहिलेलं इमेल.

उल्म (जर्मनी) राठ हाउस: शहरातलं मध्यवर्ती ठिकाण
प्रिय हरीश,  कसा  आहेस ? मला माहित आहे तुला वाटलं असेल की काय आशिष कुलकर्णी ... गेल्या नंतर संपर्कात नाही...आणि अजूनही काही वाटले असेल ;).. असो. अरे मी इतका बिझी होतो इथे सुरुवातीला ४-५ महिने ..काय सांगू, साडे चार वर्षांनी पुन्हा अभ्यास,परीक्षा ... एकदम ट्यून ईन व्हायला जरा वेळ पाहिजे.. कोणाच्याच संपर्कात नव्हतो....(पण हरीश ला लिहायचं आहे हे होतं मनात कुठेतरी) आणि चाट मध्ये वैगरे होत नाहीत रे गोष्टी सांगून ...पत्र रे पत्र च !..त्यात जी ताकद ना टी चाट मध्ये कुठे ? ..आता जरा मोकळा आहे ...म्हणालं लिहावं आता हरीशला थोडं विस्तारीत पत्र...तर मला लिहिण्याचे विषय म्हणजे इथले लोक.. आणि अनुभव. तेच सांगतो तर आता..

हा !...माझं म्हणशील ना तर I am humbled after seeing people here from different parts of the world ..नक्की अंदाज येत नाही की कोण किती पाण्यात आहे याचा एकदम ... पण २-४ चायनीज मुलांशी ओळख झालीये... फार फार फार फार मेहनती असतात हि मुलं..! म्हणजे प्रत्येकात एक आक्रमक dragon आहे असं वाटतं मला ! पण एकाच थिंकिंग प्लेन वर आहेत की नाही माहित नाही.. मला मी जिथं आहे तिथून जसं दिसतंय ते सांगतो..चीनच्या आणि भारताच्या शिक्षण पद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे .. चीन भारता पेक्षा जवळपास सगळ्यात क्षेत्रात पुढे आहे असा मला फील येतोय.. आपल्या शिक्षण पद्धतीत गंभीर उणीवा आहेत....हे मला वारंवार अनुभवाला येतंय ..

  "मूळ शिक्षणाचा दर्जा हा त्या माणसाच्या वैचारिक आणि त्यायोगे येणाऱ्या कृतीचा आणि पर्यायाने आयुष्याचा दर्जा ठरवत असतं ! गोष्टी जेव्हा 'जग' या पातळीवर येतात ना.. तेव्हा मूळ शिक्षण हीच गोष्ट सगळ्यात मुलभूत ठरते.. हे वाचणं वेगळं आहे .. आणि अनुभवणं वेगळं " 

सध्या चायनीज एकाच गोष्टी मुळे मार खात आहेत की इंग्लिश नीट बोलता येत नाही .. आणि (पाश्चिमात्य) जग चीन ला, कम्युनिस्ट असल्या कारणाने, एन-केन कारणाने एकट पाडायचा विचार करतं (जसं की खोचक पणे गेल्या वर्षी चीन ला शांततेच नोबेल दिलं...Nobel Peace Prize for 2010 to Liu Xiaobo for his long and non-violent struggle for fundamental human rights in China...) आणि चीन कसा जगासाठी फक्त कारखाना आहे आणि भारत म्हणजे कसा दोघात संशोधनासाठी अधिक चांगला देश आहे असं भासवत आहे ...पण असं नाही..हे लोक पुढे आहेत नक्कीच... मी म्हणेन ९९ टक्के भारतीयांना माहित नाहीये चीन काय चीज आहे ते...! भारतीय अजूनही झोपेत आहेत असं मला वाटतं ! Literally all .. all wrong things come up in Democracy...आणि आपल्याकडे तर उच्छाद मांडलाय ... china is single point clear mentality and it shows in their each indivdual कोणा इतर कडून काही नाही पण मी ह्या चीनी विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकतोय..! हो पण हे लोक कधी कधी 'एक्स्ट्रा स्मार्ट' असू शकतात ! आणि I am not in the awe of chinese ...I never will be of anything ...but some things are revealed to me which are stunning ..& I know this is not the full picture yet .

Hirschegg (ऑस्ट्रिया) 
जर्मन लोक/विद्यार्थी जर म्हणाले तर एक गोष्ट त्यांच्या मानसिकतेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते ... utter lack of self disrespect ...किंचितहि न्यून गंड नाही... म्हणुन काही हे लोक मनात जे येईल ते स्पष्ट आणि शुद्ध शब्दात बोलून दाखवतात... दांभिकता तर शोधून सापडत नाही ...जर्मन भाषा जशी खूप logical आहे..तसं ती यांचात तेच उतरवते.. एकूणच हे लोक विचारांच्या दृष्टीने अगदी कमीत कमी ढोंगी, कमी गोंधळलेले, अधिक प्रांजळ , अधिक कृतज्ञ , व्यवस्थित-रोख ठोक, शिस्तबद्ध आणि (कधी कधी अधिक) अभिमानी वाटतात..! म्हणजे इतकं पुरेसं आहे की, जरी कोणी लगेच ..फार थोर वैचारिक पातळीचा नसला तरी ..म्हणजे तशेही इथ नक्कीच असतील, आहेत .. पण तसं दाखवायला ते जात नाहीत ! त्याचा समोरच्याला विचार करण्याचा वेळ / संधी देतात.. ह्यात जास्त मजा आहे ! कसल्याही गोष्टी वर पांघरून घालणे असला प्रकार बिलकुल नाही.. जे आहे ते आहे.. बावळत अजिबात वाटत नाहीत..! मला वाटतं प्रामाणिक पणा आणि स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडता, चूक असेल तर लगेच माफी मागून दुरुस्त करण्याची तयारी हे प्रमुख गुण..! गुणांशिवाय कोणताही देश किंवा व्यक्ती प्रगती करूच शकत नाही.. आणि प्रत्येक नागरिकात जर हे गुण आहेत तर देश प्रगती केल्या वाचून राहात नाही ..ह्याचे जर्मनी हे सगळ्यात जबरदस्त उदाहरण वाटतं मला ..! .. इतके punctual की यांचा जगणं म्हणजे पण एक world record आहे.. खरंच :) !

तसं बघितलं तर बरंच काही शिकण्या सारखंच आहे ह्या लोकांकडे ..अगदी 'पुरुषा नेही' संडास कसा स्वच्छ ठेवावा पासून आणि संशोधनासाठी दृष्टीकोन कसा असावा पर्यंत ...विशेषत: भारतीय पुरुषांसाठी तरी खूपच उत्तम अनुभव..स्वच्छतेच्या दृष्टीने...आत्तापार्यान्तच्या आलेल्या अनुभवावरून तरी जर्मनी साठी कौतुकच कौतुक आहे माझ्याकडे..! म्हणजे त्यांच्या गाड्या घोड्यांमुळे नाही...पण मुळात ... त्यांचे लोक पाहा कसे आहेत ह्यामुळे ....मी सतत विचार करत असतो की ह्यांचा mind set कसा असेल ते...बाकी आपोआपच सृष्टीच्या विधानानुसार होतं..! ज्याच्याकडे गुण आहेत ..त्याच्या कडे सगळं आहे..! ह्या लोकांच्या राहणीमानाबद्दल सांगायचं तर ..एकदम उच्च आहे रे ..मला तरी फरक वाटला खूप .. हे लोक दररोज नवे ड्रेस आणि चपला बूट घालतात की काय अशी शंका यावी ! पण असं नाही ..ते तेवढं स्वच्छ ठेवतात सगळं ...दिसायला धष्टपुष्ट असतात सगळेच.. आणि भारतात मला कोणीतरी म्हणाल होतं की जर्मन स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणेच अन्गापिंडान/चेहऱ्याने असतात .. पण अस काही नाहीये.. काही काही असतात .. विचित्र वाटतात आपल्या नजरेला..पण आता विशेष नाही वाटत ... हा पण बऱ्याच मुली सुंदर असतात दिसायाला ..नितळ गोरे पणा आणि नाकी डोळे नीटस.

सुंदरच जर म्हणल तर दिसायला तुर्कीस्तान च्या मुली देखण्या असतात ! बोलायला पण स्ट्रेट फोरवर्ड..फुकट आढे वेढे नाही..! जर्मन मुलींबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे , ह्या सर्रास सिगारेटी ओढतात .. म्हणजे माझ्या निरीक्षणानुसार मुलीच जास्त ओढताना दिसतात मुलांपेक्षा .. अजून एक गोष्ट, ही जर्मन लोकान बद्दल नाहीये पण इस्लामी मुलींबद्दल आहे..! इस्लाम मध्ये जर दारू पिणे सिगारेटी ओढणे ह्या गोष्टींसाठी पुरुषालाही मज्जाव आहे .. पण इथे आमच्या वर्गातल्या इराणी मुलीला (टी इस्लामीच असावी) सराईतपणे सिगारेट ओढताना पाहिलंय आणि एक तुर्किश मुलगी आहे ... तिला आमच्या वेलकम रिसेप्शन मध्ये शाम्पेन पिताना पाहिलंय....म्हणजे ह्या मुली नॉर्मल/सरळ वाटतात बोलायला ...आगाऊ असही नाही ... मला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत .. हे लोक जर कट्टर .. तर ह्या अश्या त्यांच्या धर्मा पलीकडच्या गोष्टी चार चौघात करण्यास कसं काय धजतात.. म्हणजे मी खूप धार्मिक आहे अस नाही पण.. हे लोक स्वताहाला म्हणवतात म्हणुन प्रश्न पडतो ड्युअल वागणुकीचा ! म्हणजे जगात नेमकं चाल्लय तरी काय, असो पुढे मागे त्यांच्याशी संवाद साधता आला तर हा प्रश्न/शंका (टीका म्हणुन नाही) मी विचारणार आहे त्यांना ! बघू काय उत्तर मिळतं ते !

१८ ऑक्टोबर २०१० : क्लास ट्रीप ऑस्ट्रीअन आल्प्स पाहण्यासाठी गेलो असतानाचा 
तुला सांगितलं होतं बहुतेक की .. आम्ही वर्गात १०+ वेगवेगळ्या nationalities आहोत ते.. पण ... मित्र-मैत्रिणी : सध्या फक्त ओळखी होत आहेत...मैत्री वगैरे म्हणजे कितपत होईल आणि कितीक दृढ होईल ह्याबद्दल मला जरा शंकाच आहे..! हि एक गोष्ट जरा अनपेक्षित होती... इथे सगळे मोकळे आहेत तसे .. पण मैत्री साठी जो दिल खुलासपणा (ढिल्लेपणा नाही) असावा लागतो तो अजून कुठे सापडला नाही.. वागण्या बोलण्यात जरा कृत्रिमता आणि मोजून मापून बोलण्याची तऱ्हा आहे ! चूक काहीच नाही..पण मैत्रीच्या दृष्टीने अजून वातावरण तसं ठीकच आहे..! वर्गात ज्या देशातले मुलं जास्त ते आपापसात असतात (चीनी , इराणी).. त्यांना इतरांची गरज नाही... साहजिक आहे..!

मी आणि मागे हिर्शेग्ग (ऑस्ट्रिया) येथील निम-बर्फ़ाच्छादित पर्वत , ऑक्टोबर २०१० 
माझ्यातही बदल होतच आहेत की... पण काय आणि किती लिहावं याला मर्यादा नाहीत.
इथल्या प्रत्येक गोष्टी बद्दल नविन विचार येतात मनात ..त्याची आपल्या इथल्या भौतिक, सामाजिक वातावरणाशी आणि मानासिकतेबरोबर तुलना, हे आजकाल रोजचच होऊन बसलय.. पुन्हा त्यावरची मतं ...चालूच सतत ..... पण तरीही पुन्हा कळवेल तुला सविस्तर..

तुझा मित्र,
आशिष कुलकर्णी

Sunday, January 29, 2012

चित्रपट - जोगवा (२००९) : लल्लाटी भंडारं..!

माझं एक आवडतं गाणं !
चित्रपट : जोगवा (२००९)
संगीत : अजय - अतुल
गीतकार : संजय पाटील
गायक : अजय गोगावले



~~ गाण्याचे शब्द ~~

नदीच्या पल्याड, आईचा डोंगंरं,
डोंगंरं माथ्याला, देवीचं मंदीरं,
घालू जागरं जागरं,डोंगंरं माथ्याला,
हे लल्लाटी भंडारं, दूर लोटून दे अंधारं
आलो दुरून रान्गुन डोंगर येन्गुन उघड देवी दारं ...हे..II धृ. II

नदीच्या पान्यावरं, अंगीनं फुटत,
तुझ्या नजरंच्या तालावरं, काळीजं डुलंतं,
नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंगराला...II १ II

नवसाला पाव तू देवी माझ्या, हाकला धाव तू,
हाकला धाव तू देवी माझ्या, अंतरी रहाव तू,
देवी माझ्या अंतरी रहाव तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू ...II २ II

डोळा भरूनं, तुझी मुरतं पाहीनं,
मुरतं पाहीनं, तुझं महिमा गाईन,
महिमा गाईन, तुला घुंगऱ्या वाहीनं,
घुंगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन,
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला....II ३ II

यल्लमा देवी चा जागर ह्यो, भक्ती चा सागर
निविदाची ची भाकर दावती हि गं, जमल्या गं लेकर
पुनवेचा चांदवा, देवी चा मायेचा पाझर
आई च्या मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर...II ४ II

खना नारळाने तुझी, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरेन
आई सांभाळ सांभाळ, कुशीतं लेकराला ...II ५ II

Thursday, December 22, 2011

फेस–बुक –चीड–चीड

नेमकं हातात पेन घेऊन लिहायला बसलं की उडाले विचार आणि पुन्हा त्याचं विचारांचा पाठलाग करायचा म्हणजे अंधारात पत्ते शोधण्यासारखं आहे. काडी एकदा जशी पेटते ना तशी ती पुन्हा कधीच पेटत नाही, नंतर दुसरीच काडी पेटते विचारांचं तसच आहे तर विचारांना सुरुवात फेसबुक वर 'कुलकर्णी' ग्रूप वर (कदाचित उपयुक्त) टीका ह्यातून झाली. तर, हि कम्युनिटी कशाला सुरु केलीये देवजाणे ! पण अगदी निर्हेतुक वाटते, नव्हे आहेच. उगाच चार ठिकाणचे तेच ते विनोद/ लेख उत्स्फूर्त पणे 'पेस्ट' करण्यात काय तथ्य आहे ? कोणता उदात्त हेतू साध्य होतोय अशानी?

फेसबुक हे एक आधुनिक तंत्र-ज्ञान असले तरी त्याची उपयुक्तता हे दुय्यम दर्जाच्या वेब रंजनासाठीच होताना दिसतेय. आपण खरंच काहीतरी दर्जेदार पद्धतीने अशा ग्रुप्स चा उपयोग करावा हे कोणाच्या गावातही नाही वाटतं. बरं म्हणावं तर लोक एवढं मोकळं हि लिहित नाहीत. विज्ञान, साहित्य, कला यावर भाष्य करणे किंवा अजूनही कुठला चांगला उपयोग करणे..कुठाय सगळं ? का नाही करू शकत ? कॉम्पुटर ऑपरेट करू शकणारे लोक इतके मागास असू शकतात ? निदान एखाद्या गोष्टीवर प्रामाणिक पणे मतं तरी नोंदवतात का कोणी ? उगाच चार चौघांच्या 'प्रोफाईल' वर टिचक्या मारत बसायचं. आधी लोक गावभर उन्डरणे याला टुकार-पणा, आवारागर्दी म्हणायचे आता एका जागी बसूनही हे शक्य करून दिलंय फेसबुकनी या २१ व्या शतकात. फेसबुक वरच प्रत्येक पेज हे जनसामान्यांसाठी एक प्रकारे 'पेज ३' होऊन बसलंय. हे असले विचार उद्विग्न करतात मनाला आणि तिसऱ्या सेकंदाला हा ग्रूप अनजॉईन करावा आणि विंडो बंद करून टाकावी असं उत्कटतेने वाटते.

अर्थ शोधायचा नाहीये का कोणाला ? किंवा नसेल तर निर्माण करायचा ? शुद्ध मंदपणा नाहीये का हा ? सकारात्मक म्हणालं तर फेसबुक मुळे लोकं जरा जवळ आली आणि लोक जवळ आले की वेग वेगळ्या प्रचंड शक्यता निर्माण होऊ शकतात.. बरं आता जरा जवळ आलोत पण पुढे काय ?? काहीच होताना दिसत नाहीये..राज्य क्रांत्यांशिवाय !

(दिनांक-२७/४/११)

Sunday, December 18, 2011

लिहिणं आणि बोलणं

माणूस निश्चतपणे आधी बोलायला शिकला आणि नंतर लिहायला. लिहिणं हि याचाच अर्थ उन्नत अवस्था आहे. संशोधनाच्या दृष्टीकोनातून..म्हणजे अधिक उन्नत होण्याच्या गरजेतून .. ह्या दोन्ही मुलभूत क्षमतांच अतिसंक्षिप्त मूल्य मापन इथं करण्याचा प्रयत्न. लिहिताना जे लिहायचं आहे त्याबद्दल मेंदूला विचार करायला अधिक वेळ मिळतो, कारण लिहिताना आपण विचार करू शकतो. "बोलताना" तसंच नसतं, बोलणारा बोलूच शकतो, बोलताना सोबत विचारहि करणं म्हणजे (महा) कठीण ..आणि लिहिण्यापेक्षा बोलणं लवकर संपतं त्यामुळे केला विचार बोलताना तर त्यासाठीही वेळ मिळतो तो कमीच. शिवाय, बोलताना समोर कोणीतरी असावं लागतं 'नुसतं बोलतो' हे काही समाजात बुद्धीवादाचे प्रतीक मानले जात नाही, की वाह दररोज ४-६ तास एकटाच बोल-साधनेत मग्न असतात वगैरे..लिहिताना कसं, एकट्यानेच बसू शकतो (नव्हे लागतं) तासन तास ..दिवसेंदिवस आणि समोर कोणी असावं लागतं नाही.. (नकोच कोणी खरं तर) ..असं लिहित बसण्याला 'लेखन साधना' वगैरे गोंडस, प्रतिष्ठित नावं हि प्राप्त होतात.. कोणासमोर बोलायचं म्हणजे फार काळजी घ्यावी लागते, इच्छा नसली तरी. समोरच्याला जरा शिव्याशाप द्यायची सोय नाही, नाही तर तो कायमचा पळालाच समजा. त्याच्या/तिच्या बाजूने घ्याव लागतं यात आपली मूळ भावव्यक्तता बदलू शकते, अर्थात हे व्यक्तीवर अवलंबून आहे पण भावना 'modulate' होते, 'sophisticate' होते एवढं तर मी म्हणूच शकतो..कितपत होते हा भाग वेगळा..

Image Source:  http://lauraberry.wordpress.com/   
लिहिताना किंवा वाचताना जेव्हढे बारकावे लक्षात येतात तेव्हढे बोलताना आणि ऐकताना लक्षात येतात का ?..बोललेलं विरून जातं हवेत..बोलणाऱ्याला सुद्धा ते आठवणार नाही एखाद्यावेळेस की आपण काय बोललो ते..लिहिलेलं कागदावर टिकून राहतं...शिवाय प्रत्येक वेळेस वाचल्यावर वेगळं नव्याने काहीतरी समजत असतं. ऐकणं बहुतेकवेळा एकदाच होतं ! लिहिणं आणि वाचणं हे बोलणं आणि ऐकण्यापेक्षा निर्विवादपणे जास्त उपयुक्त आहे संशोधनासाठी..लिहिणं वाचणं हे एकट्याने साध्य आहे..त्यामुळे ते स्वतःच जास्त पूर्ण हि आहे !

लिहिलेलं वाचन करणारा म्हणजे म्हणजे वाचणे हि वाचणाऱ्याचीच खाज असते अखेर, लिहिणारा हे जाणून लिहू शकतो, त्यात वाचकाला शिव्या जरी हाणल्या असतील तरी तेव्हा लिहिणारा मात्र तेव्हा समोर नसतो.. ह्या शिव्या खाणं हा खरंतर वाचणाऱ्याचाच choice असतो . ऐकणं हे तेव्हढ सक्तीचं नाही..ऐकणारा काही गोष्टी लागलीच फेटाळून लावू शकतो… वाचताना त्या वाचाव्याच लागतात आणि काही काळ तरी त्या तशाच राहतात.या शिव्या शापाखेरीज..वाचन म्हणजे समोरच्याचे विचार त्याच्याच शब्दातून पाहणं .. त्याला लिहिताना मनात जे आहे ते जास्त तसच्या तसं ..modulate fodulate न होता उतरवता येतं..व्यक्तशुद्धतेचे महत्वाचे,अधिक गुण लिहिण्याला बोलण्यापेक्षा. लिहिणं हे बोलण्यापेक्षा जरा अधिक बिनधास्तच! एका संस्कृत सुभाषिताप्रमाणे आपले मुख म्हणजे अज्ञानाचे द्वार आहे आणि गांधी म्हणून गेलेत की मौनात प्रचंड सामर्थ्य आहे..तेव्हा निष्कर्ष म्हणुन आपण असं म्हणू या क की अधिक उन्नत व्हायचं असेल मानवाला तर त्यांनी त्याचं तोंड जरा बंद ठेवलेलाच बरं ?

Saturday, March 19, 2011

" विदे - शी "

हा..!...तर इथे (उल्म, जर्मनी ) येऊनही मी माझ्या भारतीय पद्धती विसरू शकत नाही याचे अगदी महत्वाचे आणि रोजचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी शी करण्याची पद्धत ..इथे कमोड पद्धती आहे...नुसती पुसा पुशी जी माझ्या भारतीय मनाला आणि शरीराला रुचत नाही... कितीही पुसलं तरी "स्वच्छ नाही झालं वाटतं" ही साशंकता शिवाय नंतरवास येईन की काय ही त्याहून मोठी भीती ...आणि पादलो बिदलो कधी तर "चड्डी थोडी खराब झाली असेल" हे कुतूहल .. असो, माझ्या एकट्यासाठी कोणी भारतीय शैलीचा संडास इथे बांधणार नाही...! त्यामुळे ती अपेक्षा करणं व्यर्थ आहे....शिवाय भारतीय पद्धतच म्हणालं तर .. बाहेर जाऊन करावं म्हणलं तर... थंडी इतकी की बाहेर कुठे टमरेल घेऊन जाणे हे म्हणजे शाप दिल्याप्रमाणे ...हाता पायाला जिथे थंडी सोसवतहोत नाही तिथे अशी कामे करून नसती रिस्क कशाला घ्या ..जरी घ्यायची म्हणलं आणिथंडीमुळे शी बाहेर येतानाच गोठली तर ?? देवा देवा ! त्यामुळे ह्या महत्वाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मी दीड लिटर ची एक (कोल्ड्रिंक ची) बाटली नळाला येणाऱ्या गरम पाण्याने पुरेपूर भरून घेऊन संडासातच जातो.. आणि कमोड वरच भारतीय पद्धतीने बसतो..आणि आरामात कार्यक्रम उरकतो....कसलाही त्रास नाही... काही वेगळं पण वाटत नाही.. भारतीय फीलच असतो..फक्त तोल जरा सांभाळावा लागतो..! शी ला जाताना ".... फिर भी दिल है हिंदुस्तानी " हे गाणं आठवत..! :) इथल्याकमोड चे डिझाईन पण जरा चांगले म्हणावे म्हणजे त्यातील पाण्यात जरी शी वेगाने प्रवेश करती झाली तरी वापस तेच पाणी चिडून पायावर येत नाही .. जर्मन डिझाईन चे आभार ! मुंबईला कंपनी मध्ये असा प्रयोग एकदा करून पाहिला होता तेव्हा शी च landing कमोडच्या उतारी भागावर मुद्दाम मोठ्या प्रयत्नाने करावं लागायच जेणेकरून खालचे तीर्थ अंगावर उडू नये.. पण घडायचं उलट .. ह्याचा मनोमन राग आला तरी गरज आपलीच म्हणुन पर्याय नसायचा ...त्यामुळे मुंबईतल्या कमोड डिझाईन चा धिक्कार असो !

Sunday, December 21, 2008

'कांदे-पोहे'

कांदे पोह्यांची व्याख्या ही अगदी काल पर्यंत 'दिवसाच्या कुठल्याही वेळी अचानक उपटलेल्या पाव्हण्यांपासुन ते परगावाहुन नुकत्याच हाशहुश करत पोचलेल्या रावळ्या पर्यंत कोणाही बरोबर मनसोक्त गप्पांचा मूड जमविताना अत्यावश्यक खाद्यप्रकार' अशी होती.."आई पोहे कर ना", "मंडळी चहा पोह्यांचं बघा..मी आलोच पंतांना घेउन" किंवा "आला आहात तसे जेउनच जा नहितर पोहे टाकु का चटकन ?"अशा अनेक खमंग वाक्यानी आत्तापर्यंत धमाल मजा आणलेली होती पण घरी आमचे "दोनाचे चार" करण्याचे मनसुबे रचले जाऊ लागले आणि कांदे पोह्याचा अर्थ पार बदलुनच गेला..


येणार म्हणता म्हणता तो क्षण येउन ठेपतो. रविवार संध्याकाळ...५ वा. ३० मि. श्री. अमुक तमूक आपल्या (कन्या व पत्नी रत्नांसह) आमच्या घरी मला बघायला येतात. त्यांची गाडी (चार चाकी = पहिल्या दुचाकीवर श्री व सौ तमुक + दुसर्‍या दुचाकीवर कु. तमुक ) घराच्या बाहेर येउन थांबते. आमचे बाबा बाहेर जाउन त्यांचं स्वागत करतात. मी आतल्या खोलीत उभा असतो. माझ्यावर (ओढवलेला) हा पहिलाच प्रसंग्....त्यामुळे जरा...."वेंधळ्यासारख वागु नका आणि हे काय टी शर्ट आणि जीन्स घालुन बसलाएस्....चांगला लांब बाह्याचा सदरा आणि साधी प्यांट घाल म्हटलं तर... पण ऐकशील तर तो तु कसला ?" - आईच्या फायनल टिप्स. "...ह, छान वाटत आहे रे मुलगी..." - मागच्या खिडकीतुन फिल्डिंग लावणार्‍या आमच्या बहिणाबाई. "काय आले क रे लोक ?" - भिंगाचा चष्मा वर खाली करुन लांबचं पहाण्याचा आजोबांचा अयशस्वी प्रयत्न....

"
या या नमस्कार, हे हे .... सापडले ना घर बरोबर ? तसे रस्त्यापासुन फार काही आत नाही आमचे घर.... हे हे ....या ना बसा" - आमचे बाबा ("या ना बसा" एवढे सोडुन बाकी 'वरपिता' कॅटेगरी डायलॉग) ही माझी मिसेस आणि मुलगी.... हे हे हे ....- मुलीचे बाबा (मी आतुन (मनात): मला वाटलं शेजारच्यांच्या आहेत). आमची आई पाण्याची बाटली आणि तीनच ग्लास (ट्रे मध्ये.... अरे वा नविन ट्रे?) घेउन बाहेर जाते.
आमची आई - (मानेनच दांपत्याला नमस्कार) उकडतय नाही थोडं .. (पंखा लावते).. यापुढे बैठकीच्या खोलीत प्रत्येक गोष्ट ट्रे मध्येच जाते किंवा येते..
त्यानंतर दोन्ही जोडपी परस्पर परिचय करुन घेतात... त्यात इकडच्या तिकडच्या ओळखी काढतात. अरे वा ते का त्याना तर मी चांगला ओळखतो.. अय्या कोण मिसेस ह्या का .. माझी बालमैत्रीण... इत्यादी इत्यादी. मग
आ.बा - "अगं आपल्या (कुल) दीपक ला बोलव ना" (मु.बा. चा जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो)... आणि आमची रंगमंचावर एंट्री होते. वातावरणात एक अद्रुष्य ताण.. मुलीच्या पालकांना नमस्कार अन मुलीकडे ओझरते पाहुन 'हाय' म्हणतो (मुलगी हसतमुख आहे)... माझ्या हार्ट्-बीट्स थोड्या वाढतात.... चार मोठ्ठ्या लोकांसमोर मुलीकडे "बघायच" म्हणजे .... छ्या.... तरी पण धीर करुन वर बघतो, ती निवांत माझ्याकडे रोखुन बघत असते... यापुढील संवादात कंसातील वाक्ये माझ्या मनातील विचार आहेत हे सूज्ञांस सांगणे न लागे. तसेच प्रत्येक वाक्याच्या शेवटी हे हे हे ...असं (बळच) हसू गृहीत धरावे..

मु.बा. - कुठे असता आपण ?
मी - (मी सर्वत्र असतो ... मी ब्रह्म आहे ) वीक डेझ ला मुंबईला, वीक एन्ड ला पुण्यात.
मु.बा. - नोकरी कुठेशी आहे ? कामाचे स्वरुप काय ? (मी नक्की काय काय सांगावे याच्या गोंधळात..)
आ.बा. -( नाटकाच्या प्रॉम्टर प्रमाणे )- तो xxyyzz Consulting कंपनी मध्ये आहे..
मु.बा. - नाव काय म्हणालात ?
आ.बा. - xxyyzz ... मल्टीनॅशनल सॉफ्ट्वेअर कंपनी आहे..(आ.बा. ची छाती उगाच फुअगली आहे..)
मु.बा. - हे हे हे आजकाल सॉफ्ट्वेअर म्हणजे अगदी.. हे हे हे ...आपल्या वगु नाना चा बंड्या पण असाच कुठे तरी आहे नाही का गं? (मु.बा. ची विकेट गेली आहे पण सावरुन घेण्याचा निष्फळ प्रयत्न..)
मु.आ. - (सवयी प्रमाणे मान डोलावत) हो ना (मु. आ. ने मेक अप केला असावा.........मी मु. आ. कडे का बघतोय ?)
आ.आ. - आमचा ह पण युरोप, अमेरिका, जपान सगळीकडे फिरुन आलाय. आत्ताच promotion पण झाले.
मु.बा. - मग तिकडेच होणार का settle ? (मु. आ. घर बघुन घेत आहेत)
मी - नाही पुणे तिथे काय उणे ?(मु.बा. ना मी आगाऊ वाटलेलो आहे... एक पत्ता कट..)
मु.आ. - काही Hobbies वगैरे ?.. हे हे ...(मु.आ. ला म्या गरीबाचे घर आवडलेले दिसत नाही...दुसरा पत्ता कट..)
आ.बा. - वाचन , लेखन (मी साक्षर आहे..).. नाटक करतो (बाबा तुम्ही सुद्धा ?) सगळे मित्र मिळुन गाण्याची मैफिल वगैरे करतात...(नको बाबा नको) फक्त काम एके काम अस नहिये त्याचं .... (हे सांगाय्लाच पाहिजे का ?.... please ! )
मु. आ. अशक्य प्लास्टिक हसत - हो का ...वा ! मुंबईत घर आहे का ? ( ..track change ? Directमुद्यावर !)
मी - सध्या paying guest म्हणुन राह्तो .. एकटाच असल्यामुळे ... आणि मुंबईत Rents...
मु.आ. - हं म्हणजे सध्या "घर" असं नाही .... (तिसरा पत्ता कट..)... कोणाकडे राहता ?
मी - (काकु मला 'अहो' म्हणु नका ना....तरुण आहे मी अजुन..) एका सिंधी फॅमिली कडे..
मु.आ. - बरं बरं .. (शी "इतर" लोकांमध्ये कसं बाई..... अजुन एक पत्ता कट)
मु.बा. - सॉफ्ट्वेअर म्हणजे नक्की काय काम करता ?
मी - (अशक्य हसू येतय पण तरी हसता कामा नये... काय सांगाव... गोट्या खेळतो किंवा पत्ते... भिकार सावकार... मेल मेल ... जाऊ दे लढवुच खिंड... घ्या काका ...झेला..)
मुलीकडे धीराने नजर रोखत... Basically we are into end-to-end customized resource planning application development for clients around the globe. We offer business process consulting in SAP, Blue print realizations, Development and post-golive support... I lead a cross application integration team.... (पण नजर अजुन हटवलेली नाही...हुश्श !! ...तोफांचे आवाज झाले का ?)
मु.बा. - पाणी पितात. (जित मया ... मी आता सुखाने मरतो.)
मुलगी - पापण्याची पिट्पिट करुन, impress झाल्याचा उत्तम अभिनय वठवते.
(
असो पण ही आधी का नाही सापडली ? नाटकात घेतली असती. फिट Heroin आहे.. डोळे जाम मोहक आहेत.. आणि आत्ताच नको खोलात शिरायला...पण ही Arrange marriage पर्यंत पोचलीच कशी ?Advance booking कसं काय नाही ? आता नसेलही एखादीच... असो..)
आ.आ.- मुलीला कशाची आवड आहे म्हणजे काही extra curricular ....
मुलगी खत्तर्नाक गोड हसते...ती पाहताच (सुबक हसरी बाला) कलिजा खलास झाला.... (पु.लं. नी माफ करावे)
मु.आ. - ज्योती (Hmm..) गाणं शिकते. Trekking ची आवड आहे. झालच तर Cooking Knitting, Sculpture etc. (शिवणकाम, भरतकाम याचे modern समानार्थी शब्द) आणि फिरायला पण खुप आवडतं (बाप रे !! ) तिने चाय्नीज चा कोर्स पण केला आहे.. (पाककृती की भाषा ? काकु बहुधा भाषेविषयी बोलत असाव्यात... पण मुळात काकु का बोलताएत ? मुलगी मुकी आहे काय? का फक्त चायनीज बोलते? मला चायनीज बोलता येत नसले तरी , खायला आवडते.. हे हे हे..)
आ.आ. - वा ! हुरहुन्नरी आहे..यांच्यासारखीच (घ्या...परत मी कशाला .... सुंदरी माफ कर..)

मग बहिणाबाई कांदेपोहे (ट्रे मधुन) घेउन येतात, आई सर्वांना देते.
मु.आ. - हे हे हे .... माझा उपास आहे . (रविवारी ? ..... उत्तम, आई ती डिश मला दे... काकु तुम्ही थंड पाणी घेणार का ?)
आ.आ. - बर मग थोडी खिचडी घ्या.. (आयला ... आईचं specialization दिसतय असल्या programsमध्ये) ... अगं थोडी खिचडी आण... बर का ... ही आमची मुलगी ... Psychology शिकते. (बहीण आणि मुलगी एकमेकांकडे बघुन सांकेतिक हसतात....दोन वीर लढाईच्या सुरुवातीला एकदाच एकमेकांकडे बघुन हसतात तसे..)
मी - आणि घरी माझ्यावर विविध mental प्रयोग करते. (फक्त आ.बा. आणि आ.आ. हसतात.. विनोदाचा प्रयत्न फसला.. हरकत नाही. पुढच्या वेळी जमेल. मुलगी निवांत खाते आहे. मु.बा. पण चवीने खात आहेत्.मु.आ. चे पाककौशल्य बेताचेच असावे आणि मुलीला आरशापुढुन हलण्यात वेळच मिळत नसावा.)
मु.आ. - मग हिच्यासाठी बघताय की नाही ? हे हे हे .... (हा काय आचरट प्रश्न ? आधी तुमच्या मुलीचं जमवा)
आ.बा. - मग आता CA चे किती पेपर राहिले आहेत अजुन ? (मुलगी CA करते वा, माहितीत भर..)
मु.बा. - "राहिले" नाहियेत, अजुन द्यायचे आहेत...(मु.बा.चा पुणेरी स्पष्ट्वक्ता चौकार...वा...वा )
आ.बा. - असं होय. बरेच लोक बरीच वर्ष CA "करत"च असतात म्हणुन विचारल.. (आ.बा. चा पुणेरी षटकार. He leads from the front..मु.बा. चिडले पण कंट्रोल करतात... शेवटचा पत्ता कट ) पुढे नौकरी करणार की...
मु.बा. - तिचं तस काही नाही. (आता मुलगी बोलली नाही तर मी इथुन उठुन जाईल..)
मुलगी - (शेवटी एकदाची) depends.... (मंडळ आभारी आहे. उसने मेरे मन की बात सुन ली ह्यालाचclick होणे म्हणतात कि काय ? तज्ञांचे मत ? असो.. पण depends म्हणजे ? जाऊ दे.. depends तरdepends)
आ.बा. - मुलीला जर काही विचारायचे असेल तर हरकत नाही किंवा दीपक ज्योती तुम्ही आतल्या खोलीत गेलात तरी चालेल. (मुलगी फक्त हसणं Continue करते आत जायला हरकत नाही... पण ती काहीच म्हटली नाही.... ती म्हटली असती तर गेलो हि असतो पण नको ..... उगाच काय .... न ओळख न पाळख..)
आ.बा. - तुला काही विचारायचं आहे का रे ? (हे मुग्ध गौरांगने तुझ्या मनात मझ्याविषयी काहीच विचार चालु नाही हाच तुझ्या गूढ हास्याचा अर्थ आहे ना ?)
मी - सवाई गंधर्व (संगीत महोत्सव) ला आली होतीस का या वेळी ?
ती - (आश्चर्याने) हो मी नेहमीच असते. तू ?
मी - (कुठे बसली होतीस ? मला दिसली नाहीस .. ) हो. मला काही फारस कळत नाही पण आपण आपलं पिशवीत चपला घालुन पहिल्या रांगेत जाउन बसायच. आम्ही कानसेन... (आ.बा. आणि आ.आ.by default हसतात.. हशा वसुल पु.ल. चे आभार.. )
याच समेवर लाईट जातात (माझ्या भविष्यातील अंधाराचे Symbol?)
दोन्ही बाबा भारनियमन, प्रदूषण, भ्रष्टाचार आणि या विषयांवर मतप्रदर्शन करतात. मुलीची आई आणि मुलगी यांच्यात(बहुतेक चायनीज) कुजबुज होते.. आमची आई आधीच लावलेला कंदील आणायला (ट्रे घेउन) आत जाते. लाईट येतात. मी अजुन अंधारातच... मग कुणीच काही बोलत नाही. इतक्यात आजोबा रंगमंचावर entry घेतात.. सर्व जण उठुन उभे राह्तात. मुलगी त्यांना वाकुन नमस्कार करते... (आयला म्हणजे मी पण करायचा की काय? तमुक दांपत्याला) आजोबा एक प्रश्न विचारुन जातात. ते गेल्यावर मुलीच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटते. आई कंदील ऐवजी चहा घेउन येते. मी व आ.बा. फुर्र फुर्र न करता चहा पितो. मु.बा. फुर्र फुर्र करत चहा पितात. मुलगी सळ्याचे कप टीपॉयवर ठेवते. (गृह्कृत्यदक्ष आहे हे कळले...धन्यवाद..) सर्व जण एकमेकांकडे बघुन उगीच स्मित हास्य करतात.....
मु.बा. - मग , येउ आम्ही ? महिला वर्गाचा कुंकु Application and Exchange Programme होतो. मुलगी जाताना वळुन बघते. गोड हसते (मेहंगी सजाके रखना ?)
आ.बा. - तुम्ही कळवाल ना आम्हाला ?
मु.बा. - हो . दोन दिवसात विचार करुन (हा हा..) कळवतो.
ते जातात. आमची गोलमेज परिषद भरते. आई बाबांना मुलगी पसंत आहे. पोहे देउ का अजुन थोडे?...बहिणाबाई मी नको म्हणतो (जीवनात पहिल्यांदा)..मला माझे मत विचारण्यात येते. त्याने काही फरक पडणार नाही असे मी म्हणतो. (..देवा ही काय वेळ आणलीस माझ्यावर ...ये तो शुरुवात है....अजुन काय काय पाहायचय..) त्यांचा होकार येईल असे आई बाबंना वाटत असते.. मी "Who's next in the list ?" विचारतो.
दोन दिवसांनी त्यांचा फोन येतो "आपला योग नाही".
घरी पुढच्या रविवारच्या कांदे पोह्यांची तयारी नव्या उत्साहाने सुरु होते.
समाप्त.

-
धनंजय

Tuesday, December 16, 2008

तुझे आहे तुजपाशी..


आम्ही १७ मार्च २००६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास लिहिलेला हा लेख इथ उतरवावा अस मनात आलं ... आणि,

"आत्ताच टॉई**ला" गेलो होतो नी अचानक काहीतरी चांगलं म्हणा, समजूतदार म्हणा.. पण तसलेच काही विचार मनात डोकाऊ लागले... म्हणलं शरिराची कोणती क्रिया चालली आहे आणि मनाची काय ? काही तारतम्यच नाही, पण वाटलं हे जे काही खत पोटात होतं कदाचित त्यातुनच काही सोनं उगवल असेल डोक्यात... (ईइइ.. म्हणु नका) बरं ते राहु दे !

विचार असे चालले होते की, बघा नं ! खूपदा आपल्याला वाटत कि समोरची व्यक्ति किती संपन्न, आहे म्हणजे डोक्याने किती सुपीक आहे अथवा किती कुशल आहे आणि त्यातुन डायरेक्ट अस वाटत कि ''यार, आपण कुठं तरी कमी आहोत.. 'अस' आपल्यात का नाही ?" ..वगैरे वगैरे...याची पुंगीच वाजवत असतो सतत कुठतरी.... म्हणजे आयुष्य जगण्यासाठी तशी काही कमतरता नसते पण आपल्याच मनाचं सौंदर्य कुठं तरी कमी पडतय असं वाटायला लागतं...त्यातुनच आपण मग नवे नवे विचार, उपक्रम पेरुन मनाची बाग अजुन सुंदर कशी बनवता येईल याचा विचार/प्रयत्न करतो..म्हणजे काहीही करुन समोरची व्यक्ती जशी आहे तसं काहीस रुजविण्याचा यत्न करतो..

... एखाद्या फुलपाखराला वाटावं कि, घार आकाशात किती उंच उंच उडते, किती रुबाबदार दिसते... केवढ्या मोठया गिरक्या घेते आपण तस नाही करु शकत.... अस म्हणुन का त्या फुलपाखराने खिन्न व्हायचं ? उलट आपल्यात सुंदर काय आहे याचा शोध त्या पाखरान घ्यावा... त्याला कोण सांगणार की फुलपाखरु उडताना पाहणार्‍याच्या मनाला जो आनंद होतो तो आनंद इतर कुठलाही पक्षी, कीटक उडताना पाहिल्यावर होणार आहे का ?...आणि त्या घारीचच म्हणलं तर तिला फुलपाखरासारखी साधी नक्कल तरी करता येणार आहे का ?

हेच..अगदी हेच आपल्या बाबतीत हि लागु होत.. पहा म्हणजे.. आपल्यातल्या बर्‍याच जणांना वाटत की मी फारसा सुंदर नाही दिसायला..माझी उंची कमी आहे... माझी देहयष्टी... 'माझी Figure' मुलींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ! ह्याच आणि इतर अशा अनेक गोष्टी घेउन बसतात.. व स्वतःला काय जमतं आपण कशात सरस आहोत हे डोळसपणे पाहतच नाहीत... त्यांना एकच वाटत राहत, 'सुंदर मुलींकडे कसे सगळे लोक पाहतात.. एखादा धष्टपुष्ट रुबाबदार तरुण रस्त्यावरुन चालत जात असताना .. रस्त्यातल्या अर्ध्याहुन अधिक मुलींच लक्ष त्याच्याकडे असत.(मुली पाहत नाहीत सरळ ..पण लक्ष असत.. कस ते त्यांनाच विचारा, असो.) अरे 'तुम्ही' काय आहात ते पाहा !! त्यासाठी तसुभर ही वाईट वाटण्याचे कारण नाही.. तुम्हाला जर एखाद वाद्य छान वाजविता येत असेल, एखादा खेळ उत्तमपणे खेळता येत असेल,शिल्प घडवता येत असेल, गाता येत असेल, छान कविता लिहिता येत असतील, उत्तम लेखन करता येत असेल, चित्र काढता येत असतील किंवा अजुन काहीही..काहीतरी 'सुंदर' जमत असेल तर ह्या असल्या गोष्टींची कशाला काळजी करत बसता..?

प्रतिकात्मक म्हणायचे झाल्यास.. लता मंगेशकर, पु.ल. देशपांडे दिसायला कसे आहेत/होते ? तुमच्या कविता वाचनाच्या एखादा कार्यक्रम रंगला असेल अथवा सुरांची सुंदर मैफिल असेल.. अशा कार्यक्रमात 'एक हजार' सुंदर देहांची माणसं जरी बसविली तर त्यांच्याकडे कोण पाहणार आहे ? ......... हे कोणी सांगाव !

कुणीस म्हणलं आहे.. Orange is orange and apple is apple, you can't compare them ! both are equally beautiful..! आता आम्ही म्हणतो सरबत हे सरबत असतं आणि आंब्याचा रस हा आंब्याचा रस असतो.... तहान लागल्यावर आपण सरबत पिउ आंब्याचा रस नाही.. आणि ताटात पोळीसोबत खाताना आंब्याचा रसच घेउ.. लिंबु सरबत नाही..! तसच हे..' गरज फक्त आपण कोण आहोत ह्याचा शोध घ्यायची, आपल्या जमेच्या बाजु खरच कोणत्या आहेत ? हे ओळखण्याची व त्याचा आनंद घेण्याची..स्वतःतल सौंदर्य व्यक्त करता आलं पाहिजे..ते शिकलच पाहिजे..नव्हे तर त्यासाठीच झटलं पाहिजे.. आपली चमकणारी बाजुच इतकी चमकवायची की आपल्याला न चमकणारीहि बाजु आहे याचा इतरांना विसर पडला पाहिजे..! तरच आपल्याला जीवन जगण्याची कला जमली असं म्हणता येईल.. त्यासाठी आधी 'सौंदर्य' ओळखता आलं पाहिजे..! पुढे काही सुचलच नाही, कारण विधी पूर्ण झालाय हे माझ्या ध्यानात आलं.'' :))
- आशिष कुलकर्णी
-------------------------------------------------------------------------------------------------