Sunday, December 21, 2008

'कांदे-पोहे'

कांदे पोह्यांची व्याख्या ही अगदी काल पर्यंत 'दिवसाच्या कुठल्याही वेळी अचानक उपटलेल्या पाव्हण्यांपासुन ते परगावाहुन नुकत्याच हाशहुश करत पोचलेल्या रावळ्या पर्यंत कोणाही बरोबर मनसोक्त गप्पांचा मूड जमविताना अत्यावश्यक खाद्यप्रकार' अशी होती.."आई पोहे कर ना", "मंडळी चहा पोह्यांचं बघा..मी आलोच पंतांना घेउन" किंवा "आला आहात तसे जेउनच जा नहितर पोहे टाकु का चटकन ?"अशा अनेक खमंग वाक्यानी आत्तापर्यंत धमाल मजा आणलेली होती पण घरी आमचे "दोनाचे चार" करण्याचे मनसुबे रचले जाऊ लागले आणि कांदे पोह्याचा अर्थ पार बदलुनच गेला..


येणार म्हणता म्हणता तो क्षण येउन ठेपतो. रविवार संध्याकाळ...५ वा. ३० मि. श्री. अमुक तमूक आपल्या (कन्या व पत्नी रत्नांसह) आमच्या घरी मला बघायला येतात. त्यांची गाडी (चार चाकी = पहिल्या दुचाकीवर श्री व सौ तमुक + दुसर्‍या दुचाकीवर कु. तमुक ) घराच्या बाहेर येउन थांबते. आमचे बाबा बाहेर जाउन त्यांचं स्वागत करतात. मी आतल्या खोलीत उभा असतो. माझ्यावर (ओढवलेला) हा पहिलाच प्रसंग्....त्यामुळे जरा...."वेंधळ्यासारख वागु नका आणि हे काय टी शर्ट आणि जीन्स घालुन बसलाएस्....चांगला लांब बाह्याचा सदरा आणि साधी प्यांट घाल म्हटलं तर... पण ऐकशील तर तो तु कसला ?" - आईच्या फायनल टिप्स. "...ह, छान वाटत आहे रे मुलगी..." - मागच्या खिडकीतुन फिल्डिंग लावणार्‍या आमच्या बहिणाबाई. "काय आले क रे लोक ?" - भिंगाचा चष्मा वर खाली करुन लांबचं पहाण्याचा आजोबांचा अयशस्वी प्रयत्न....

"
या या नमस्कार, हे हे .... सापडले ना घर बरोबर ? तसे रस्त्यापासुन फार काही आत नाही आमचे घर.... हे हे ....या ना बसा" - आमचे बाबा ("या ना बसा" एवढे सोडुन बाकी 'वरपिता' कॅटेगरी डायलॉग) ही माझी मिसेस आणि मुलगी.... हे हे हे ....- मुलीचे बाबा (मी आतुन (मनात): मला वाटलं शेजारच्यांच्या आहेत). आमची आई पाण्याची बाटली आणि तीनच ग्लास (ट्रे मध्ये.... अरे वा नविन ट्रे?) घेउन बाहेर जाते.
आमची आई - (मानेनच दांपत्याला नमस्कार) उकडतय नाही थोडं .. (पंखा लावते).. यापुढे बैठकीच्या खोलीत प्रत्येक गोष्ट ट्रे मध्येच जाते किंवा येते..
त्यानंतर दोन्ही जोडपी परस्पर परिचय करुन घेतात... त्यात इकडच्या तिकडच्या ओळखी काढतात. अरे वा ते का त्याना तर मी चांगला ओळखतो.. अय्या कोण मिसेस ह्या का .. माझी बालमैत्रीण... इत्यादी इत्यादी. मग
आ.बा - "अगं आपल्या (कुल) दीपक ला बोलव ना" (मु.बा. चा जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो)... आणि आमची रंगमंचावर एंट्री होते. वातावरणात एक अद्रुष्य ताण.. मुलीच्या पालकांना नमस्कार अन मुलीकडे ओझरते पाहुन 'हाय' म्हणतो (मुलगी हसतमुख आहे)... माझ्या हार्ट्-बीट्स थोड्या वाढतात.... चार मोठ्ठ्या लोकांसमोर मुलीकडे "बघायच" म्हणजे .... छ्या.... तरी पण धीर करुन वर बघतो, ती निवांत माझ्याकडे रोखुन बघत असते... यापुढील संवादात कंसातील वाक्ये माझ्या मनातील विचार आहेत हे सूज्ञांस सांगणे न लागे. तसेच प्रत्येक वाक्याच्या शेवटी हे हे हे ...असं (बळच) हसू गृहीत धरावे..

मु.बा. - कुठे असता आपण ?
मी - (मी सर्वत्र असतो ... मी ब्रह्म आहे ) वीक डेझ ला मुंबईला, वीक एन्ड ला पुण्यात.
मु.बा. - नोकरी कुठेशी आहे ? कामाचे स्वरुप काय ? (मी नक्की काय काय सांगावे याच्या गोंधळात..)
आ.बा. -( नाटकाच्या प्रॉम्टर प्रमाणे )- तो xxyyzz Consulting कंपनी मध्ये आहे..
मु.बा. - नाव काय म्हणालात ?
आ.बा. - xxyyzz ... मल्टीनॅशनल सॉफ्ट्वेअर कंपनी आहे..(आ.बा. ची छाती उगाच फुअगली आहे..)
मु.बा. - हे हे हे आजकाल सॉफ्ट्वेअर म्हणजे अगदी.. हे हे हे ...आपल्या वगु नाना चा बंड्या पण असाच कुठे तरी आहे नाही का गं? (मु.बा. ची विकेट गेली आहे पण सावरुन घेण्याचा निष्फळ प्रयत्न..)
मु.आ. - (सवयी प्रमाणे मान डोलावत) हो ना (मु. आ. ने मेक अप केला असावा.........मी मु. आ. कडे का बघतोय ?)
आ.आ. - आमचा ह पण युरोप, अमेरिका, जपान सगळीकडे फिरुन आलाय. आत्ताच promotion पण झाले.
मु.बा. - मग तिकडेच होणार का settle ? (मु. आ. घर बघुन घेत आहेत)
मी - नाही पुणे तिथे काय उणे ?(मु.बा. ना मी आगाऊ वाटलेलो आहे... एक पत्ता कट..)
मु.आ. - काही Hobbies वगैरे ?.. हे हे ...(मु.आ. ला म्या गरीबाचे घर आवडलेले दिसत नाही...दुसरा पत्ता कट..)
आ.बा. - वाचन , लेखन (मी साक्षर आहे..).. नाटक करतो (बाबा तुम्ही सुद्धा ?) सगळे मित्र मिळुन गाण्याची मैफिल वगैरे करतात...(नको बाबा नको) फक्त काम एके काम अस नहिये त्याचं .... (हे सांगाय्लाच पाहिजे का ?.... please ! )
मु. आ. अशक्य प्लास्टिक हसत - हो का ...वा ! मुंबईत घर आहे का ? ( ..track change ? Directमुद्यावर !)
मी - सध्या paying guest म्हणुन राह्तो .. एकटाच असल्यामुळे ... आणि मुंबईत Rents...
मु.आ. - हं म्हणजे सध्या "घर" असं नाही .... (तिसरा पत्ता कट..)... कोणाकडे राहता ?
मी - (काकु मला 'अहो' म्हणु नका ना....तरुण आहे मी अजुन..) एका सिंधी फॅमिली कडे..
मु.आ. - बरं बरं .. (शी "इतर" लोकांमध्ये कसं बाई..... अजुन एक पत्ता कट)
मु.बा. - सॉफ्ट्वेअर म्हणजे नक्की काय काम करता ?
मी - (अशक्य हसू येतय पण तरी हसता कामा नये... काय सांगाव... गोट्या खेळतो किंवा पत्ते... भिकार सावकार... मेल मेल ... जाऊ दे लढवुच खिंड... घ्या काका ...झेला..)
मुलीकडे धीराने नजर रोखत... Basically we are into end-to-end customized resource planning application development for clients around the globe. We offer business process consulting in SAP, Blue print realizations, Development and post-golive support... I lead a cross application integration team.... (पण नजर अजुन हटवलेली नाही...हुश्श !! ...तोफांचे आवाज झाले का ?)
मु.बा. - पाणी पितात. (जित मया ... मी आता सुखाने मरतो.)
मुलगी - पापण्याची पिट्पिट करुन, impress झाल्याचा उत्तम अभिनय वठवते.
(
असो पण ही आधी का नाही सापडली ? नाटकात घेतली असती. फिट Heroin आहे.. डोळे जाम मोहक आहेत.. आणि आत्ताच नको खोलात शिरायला...पण ही Arrange marriage पर्यंत पोचलीच कशी ?Advance booking कसं काय नाही ? आता नसेलही एखादीच... असो..)
आ.आ.- मुलीला कशाची आवड आहे म्हणजे काही extra curricular ....
मुलगी खत्तर्नाक गोड हसते...ती पाहताच (सुबक हसरी बाला) कलिजा खलास झाला.... (पु.लं. नी माफ करावे)
मु.आ. - ज्योती (Hmm..) गाणं शिकते. Trekking ची आवड आहे. झालच तर Cooking Knitting, Sculpture etc. (शिवणकाम, भरतकाम याचे modern समानार्थी शब्द) आणि फिरायला पण खुप आवडतं (बाप रे !! ) तिने चाय्नीज चा कोर्स पण केला आहे.. (पाककृती की भाषा ? काकु बहुधा भाषेविषयी बोलत असाव्यात... पण मुळात काकु का बोलताएत ? मुलगी मुकी आहे काय? का फक्त चायनीज बोलते? मला चायनीज बोलता येत नसले तरी , खायला आवडते.. हे हे हे..)
आ.आ. - वा ! हुरहुन्नरी आहे..यांच्यासारखीच (घ्या...परत मी कशाला .... सुंदरी माफ कर..)

मग बहिणाबाई कांदेपोहे (ट्रे मधुन) घेउन येतात, आई सर्वांना देते.
मु.आ. - हे हे हे .... माझा उपास आहे . (रविवारी ? ..... उत्तम, आई ती डिश मला दे... काकु तुम्ही थंड पाणी घेणार का ?)
आ.आ. - बर मग थोडी खिचडी घ्या.. (आयला ... आईचं specialization दिसतय असल्या programsमध्ये) ... अगं थोडी खिचडी आण... बर का ... ही आमची मुलगी ... Psychology शिकते. (बहीण आणि मुलगी एकमेकांकडे बघुन सांकेतिक हसतात....दोन वीर लढाईच्या सुरुवातीला एकदाच एकमेकांकडे बघुन हसतात तसे..)
मी - आणि घरी माझ्यावर विविध mental प्रयोग करते. (फक्त आ.बा. आणि आ.आ. हसतात.. विनोदाचा प्रयत्न फसला.. हरकत नाही. पुढच्या वेळी जमेल. मुलगी निवांत खाते आहे. मु.बा. पण चवीने खात आहेत्.मु.आ. चे पाककौशल्य बेताचेच असावे आणि मुलीला आरशापुढुन हलण्यात वेळच मिळत नसावा.)
मु.आ. - मग हिच्यासाठी बघताय की नाही ? हे हे हे .... (हा काय आचरट प्रश्न ? आधी तुमच्या मुलीचं जमवा)
आ.बा. - मग आता CA चे किती पेपर राहिले आहेत अजुन ? (मुलगी CA करते वा, माहितीत भर..)
मु.बा. - "राहिले" नाहियेत, अजुन द्यायचे आहेत...(मु.बा.चा पुणेरी स्पष्ट्वक्ता चौकार...वा...वा )
आ.बा. - असं होय. बरेच लोक बरीच वर्ष CA "करत"च असतात म्हणुन विचारल.. (आ.बा. चा पुणेरी षटकार. He leads from the front..मु.बा. चिडले पण कंट्रोल करतात... शेवटचा पत्ता कट ) पुढे नौकरी करणार की...
मु.बा. - तिचं तस काही नाही. (आता मुलगी बोलली नाही तर मी इथुन उठुन जाईल..)
मुलगी - (शेवटी एकदाची) depends.... (मंडळ आभारी आहे. उसने मेरे मन की बात सुन ली ह्यालाचclick होणे म्हणतात कि काय ? तज्ञांचे मत ? असो.. पण depends म्हणजे ? जाऊ दे.. depends तरdepends)
आ.बा. - मुलीला जर काही विचारायचे असेल तर हरकत नाही किंवा दीपक ज्योती तुम्ही आतल्या खोलीत गेलात तरी चालेल. (मुलगी फक्त हसणं Continue करते आत जायला हरकत नाही... पण ती काहीच म्हटली नाही.... ती म्हटली असती तर गेलो हि असतो पण नको ..... उगाच काय .... न ओळख न पाळख..)
आ.बा. - तुला काही विचारायचं आहे का रे ? (हे मुग्ध गौरांगने तुझ्या मनात मझ्याविषयी काहीच विचार चालु नाही हाच तुझ्या गूढ हास्याचा अर्थ आहे ना ?)
मी - सवाई गंधर्व (संगीत महोत्सव) ला आली होतीस का या वेळी ?
ती - (आश्चर्याने) हो मी नेहमीच असते. तू ?
मी - (कुठे बसली होतीस ? मला दिसली नाहीस .. ) हो. मला काही फारस कळत नाही पण आपण आपलं पिशवीत चपला घालुन पहिल्या रांगेत जाउन बसायच. आम्ही कानसेन... (आ.बा. आणि आ.आ.by default हसतात.. हशा वसुल पु.ल. चे आभार.. )
याच समेवर लाईट जातात (माझ्या भविष्यातील अंधाराचे Symbol?)
दोन्ही बाबा भारनियमन, प्रदूषण, भ्रष्टाचार आणि या विषयांवर मतप्रदर्शन करतात. मुलीची आई आणि मुलगी यांच्यात(बहुतेक चायनीज) कुजबुज होते.. आमची आई आधीच लावलेला कंदील आणायला (ट्रे घेउन) आत जाते. लाईट येतात. मी अजुन अंधारातच... मग कुणीच काही बोलत नाही. इतक्यात आजोबा रंगमंचावर entry घेतात.. सर्व जण उठुन उभे राह्तात. मुलगी त्यांना वाकुन नमस्कार करते... (आयला म्हणजे मी पण करायचा की काय? तमुक दांपत्याला) आजोबा एक प्रश्न विचारुन जातात. ते गेल्यावर मुलीच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटते. आई कंदील ऐवजी चहा घेउन येते. मी व आ.बा. फुर्र फुर्र न करता चहा पितो. मु.बा. फुर्र फुर्र करत चहा पितात. मुलगी सळ्याचे कप टीपॉयवर ठेवते. (गृह्कृत्यदक्ष आहे हे कळले...धन्यवाद..) सर्व जण एकमेकांकडे बघुन उगीच स्मित हास्य करतात.....
मु.बा. - मग , येउ आम्ही ? महिला वर्गाचा कुंकु Application and Exchange Programme होतो. मुलगी जाताना वळुन बघते. गोड हसते (मेहंगी सजाके रखना ?)
आ.बा. - तुम्ही कळवाल ना आम्हाला ?
मु.बा. - हो . दोन दिवसात विचार करुन (हा हा..) कळवतो.
ते जातात. आमची गोलमेज परिषद भरते. आई बाबांना मुलगी पसंत आहे. पोहे देउ का अजुन थोडे?...बहिणाबाई मी नको म्हणतो (जीवनात पहिल्यांदा)..मला माझे मत विचारण्यात येते. त्याने काही फरक पडणार नाही असे मी म्हणतो. (..देवा ही काय वेळ आणलीस माझ्यावर ...ये तो शुरुवात है....अजुन काय काय पाहायचय..) त्यांचा होकार येईल असे आई बाबंना वाटत असते.. मी "Who's next in the list ?" विचारतो.
दोन दिवसांनी त्यांचा फोन येतो "आपला योग नाही".
घरी पुढच्या रविवारच्या कांदे पोह्यांची तयारी नव्या उत्साहाने सुरु होते.
समाप्त.

-
धनंजय

5 comments:

Unknown said...

बरं...ते सोड..
सांग...लग्न केव्हा करतो आहेस :p
हा लेख लिहीणारा मानुस एकदम भारी आहे..
छान केलं की हा लेख ब्लॉगवर टाकला..कधीपण वाचता येईल आता.

prady said...

ha ha ha...

ha ha ha ha ...

apratim!!

Ashish Kulkarni said...

कपिल - प्रतिसादाबद्दल हार्दिक धन्यवाद..! आमच्या लग्नाला पार अवकाश आहे अजुन..! :)

आम्ही इतरांचे चांगले लेख देखील या ब्लॉगवर सादर करण्यास कमीपणा मानत नाही किंवा माझा ब्लॉग म्हणजे 'फक्त माझेच लेख' अशीही स्वत:ची लाल करू इच्छित नाही.... काही लोक असे करतात व त्याचे समर्थन ही करत फिरतात.... चांगलं लिहिण्याची शेअर करण्याची संधी मिळाली आहे तिचा छान मो़कळा चाकळा उपयोग आम्ही करत आहोत व पुढेही करत राहु..! :)

प्रद्युम्न - तुम्ही ब्लॉग लिहित नाहीत का आता ?

चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar said...

धनंजय असं नाम का धारण केलं आहे?

Ashish Kulkarni said...

अरे हा लेख मी लिहिलाय नहिये मुळी..
वरचा कॉमेंट वाचला असशीलच..